फरसाणच्या छोट्या व्यवसायातून गगनभरारी   

कौस्तुभ गनबोटे यांच्या जाण्याने शोककळा 

पुणे : छोटेखानी फरसाण व्यवसायाला सुरूवात करून अल्पावधीत कौस्तुभ गनबोटे यांनी व्यवसायात मोठी भरारी घेतली. अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाचे कौस्तुभ गनबोटे यांच्या अकाली जाण्याने कुंटुंबासह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. 
 
कौस्तुभ गनबोटे हे शनिवारी पत्नीसह काश्मीरला पर्यटनाला विमानाने गेले होते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभ यांचा मृत्यू झाला. ते अतिशय कष्टातून मोठे झाले होते. कौस्तुभ यांच्या लहानपणीच आईचे निधन झाले. त्यामुळे काकीने त्यांचा सांभाळ केला. कौस्तुभ यांना दोन बहिणी आहेत. मोठी बहीण दिव्यांग असून, कौस्तुभ यांनीच तिचा सांभाळ केला. तर, दुसर्‍या बहिणीचे लग्न केले. दोन महिन्यांपूर्वीच कौस्तुभ आजोबा झाले होते. त्यामुळे ते खूप आनंदात होते. आता मी जबाबदारीतून मोकळा झालो, मनसोक्त फिरणार, असेही ते म्हणाले होते. कौस्तुभ पहिल्यांदाच पुण्याबाहेर फिरायला गेले होते. 
 
ते व्यवसायाच्या वृद्धीसाठी रात्रंदिवस कष्ट करत होते. त्यामुळे त्यांनी कधी स्वत:साठी वेळ दिला नव्हता. कौस्तुभ गनबोटे हे आपल्या फरसाण व्यवसायासाठी ओळखले जायचे. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.
 
व्यवसायात त्यांना पत्नी संगीता यांची मोलाची साथ होती. कौस्तुभ यांनी कुटुंबासह काश्मीरला जाण्याचा बेत आखला होता; पण हा दौरा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. कौस्तुभ यांच्या आठवणी सांगताना मित्र परिवार गहिवरून गेला होता. पहलगाममध्ये पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारून दहशतवाद्यांनी क्रूरपणे गोळ्या झाडल्या. अशा वृत्तीला घरात घुसून मारले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया कौस्तुभ यांच्या मित्रांनी दिली. 

दोन मित्रांचा करूण अंत

कोंढव्याचे कौस्तुभ गनबोटे आणि कर्वेनगरचे संतोष जगदाळे हे दोघे जिवलग मित्र. दोघांचाही फरसाणचा व्यवसाय. त्यामुळे व्यवसायाच्या निमित्ताने दोघे कायम भेटत होते. जगदाळे हे कायम गनबोटे यांच्या दुकानात जात. विशेष म्हणजे, ते प्रत्येक सुखदु:खात एकमेकांसोबत राहत. आतापर्यंतच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर दोघांनीही एकमेकांची साथ दिली. मात्र, मृत्यूनेही दोघांना एकत्र आणि एकाच वेळी गाठले. दहशतवादी हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला.

आठ दिवसांपूर्वीच काश्मीरचे नियोजन 

संतोष जगदाळे हे आठ दिवसांपूर्वी कौस्तुभ गनबोटे यांच्या दुकानी भेटीसाठी गेले होते. त्यावेळी काश्मीर पर्यटनाचा विषय निघाला आणि सहलीचे नियोजन झाले. गनबोटे आणि त्यांच्या पत्नी, जगदाळे आणि त्याच्या पत्नी आणि मुलगी पर्यटनाला जाण्याचे ठरले. गनबोटे यांचे व्यवसायानिमित्त फिरणे झाले होते. मात्र, पर्यटनासाठी ते कधीच बाहेर पडले नव्हते. गनबोटे पहिल्यांदा पुण्याबाहेर गेले होते आणि पहिल्याच पर्यटन दौर्‍यात त्यांचा मृत्यू झाला. 

डोळ्यांत अश्रु अन् आठवणींना उजाळा

पुतण्याचा स्वभाव खूप चांगला होता. तो खूप मनमिळाऊ होता, असे सांगत कौस्तुभ यांच्या काकूंनी आठवणीला उजाळा दिला. मात्र, यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि तोंडातून हुंदके बाहेर पडत होते. कौस्तुभ यांच्या मृत्यूने  काकूंना मोठा धक्का बसला. आम्ही सगळे एकत्र राहत होतो. मात्र, व्यवसायामुळे तो कोंढव्यात स्थायिक झाला होता, असेही  त्या म्हणाल्या.
 

Related Articles